• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनि मंदिरात श्री.शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)

येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शुक्रवारी (ता.१९) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध सामाजिक,आरोग्य विषयक, रक्तदान शिबीर, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून दरवर्षी श्री.शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (ता.१३) ते शुक्रवार (ता.१९) आठ दिवस किर्तन, भजन, परमरस्य पारायण, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबीरात ५१ महिला व युवकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रक्तपेढीतील डॉक्टरांनी यासाठी सहकार्य केले. रोज सायंकाळी सहा ते आठ पावले खेळण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (ता.१९) श्री. शनैश्वर जयंती निमित्त शनैश्वर जन्मोत्सव सायंकाळी सात वाजून सात मिनीटांनी पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून साजरा करण्यात आल्यानंतर महाआरती करण्यात आली. तसेच गुरुवर्य सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले. तत्पूर्वी साडेचार ते शनैश्वर जन्मोत्सवा पर्यंत गुरुलिंग महाराज फुटके गाढे पिंपळगावकर यांचे किर्तन आयोजित केले होते. शनैश्वर जन्मोत्सवा नंतर साडेसात ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप शनीमंदिर येथे करण्यात आले. यावर्षीची विशेषतः म्हणजे महिलांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था व महिलांना महिलांनीच प्रसादाचे वाटप केले.या महाप्रसादास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.