• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. श्री स्वामी समर्थांचा 23 मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता. मात्र, स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले, असे सांगितले जाते.