• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय समुपदेशन वेबिनार

ByND NEWS INIDIA

Apr 28, 2021

सुशील टकले (गेवराई) :-

राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि

राष्ट्रीय सेवा योजना विभाग र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जुई फाऊंडेशन, आसई, ता. जाफ्राबाद, जि. जालना आणि अट्टल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दत्तक घेतलेले गाव मौजे रेवकी, ता. गेवराई, जि. बीड या दोन गावांच्या समन्वयाने दोन दिवसांचे समुपदेशन वेबिनार झूम मिटिंग आणि फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, गृहिणी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व NSS स्वयंसेवक इत्यादी घटकांसाठी विशेष करून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

समुपदेशक श्री. संजय मगर (प्रशासकीय अधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था (Govt Medical College) लातूर हे ‘जीवन कौशल्ये विकास : भावनिक बुद्धिमत्ता तसेच समस्या निराकरण व निर्णय क्षमता या दोन विषयांवर गुरुवार, दि. २९ व शुक्रवार दि. ३० एप्रिल २०२१ वेळ : रात्री ८ ते ९ रोजी संवाद साधणार आहेत.

र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथील प्राचार्य डॉ.रजनी शिखरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.टी.आर.पाटील, कार्यक्रमाधिकारी समाधान इंगळे, रेवणनाथ काळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या वेबिनारच्या निमित्ताने विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या स्तरावरील या उपक्रमात दोन गावांच्या माध्यमातून म्हणजे बीड, औरंगाबाद आणि जालना अशा तीन जिल्ह्यांना जोडणारे हे समुपदेशन घडवून आणले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच घटक प्रभावित झाले आहेत. या अदृश्य भीतीमुळे अनेकांना आपल्या भविष्याची आणि जीवनाची चिंता सतावत आहे. त्यामुळे आपल्या आंतरिक क्षमता ओळखून तणावाचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांच्या माध्यमातून हा आशावादी प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्यासाठी सर्व माहीतगारांनी सहकार्य करावे, असेही अवाहन करण्यात येत आहे.