• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनंजय मुंडेंचे अभिवचन सत्यात; परळी शहर बायपासला ६०.२३ कोटी रुपये मंजूर ! लवकरच होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात

बीड प्रतिनिधी :

ND NEWS : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघातील दिलेल्या प्रमुख अभिवंचनांपैकी परळी शहर बायपासचे अभिवचन आता सत्यात उतरत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने परळी शहर बायपासच्या चौपदरी निर्माणासाठी ६०.२३ कोटी रुपये निधी मंजूर केला असून या कामाची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक इन एच ५४८ ब च्या परळी बायपास या भागाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६०.२३ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली असून, या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

परळी शहर बायपास या रस्त्याला एक वेगळीच पार्श्वभूमी असून, मागील सरकारच्या काळात या बायपासच्या निर्माणासाठी माजी पालकमंत्र्यांनी कोनशीला, भूमिपूजन असे कार्यक्रम जवळपास तीनवेळा केले होते, मात्र या कामासाठी एक रुपया देखील निधी मंजूर करण्यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे अनेक वर्षांपासून परळीकरांची मागणी असलेला बायपास केवळ घोषणांमध्येच राहिला होता. तर धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत या बायपास रस्त्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे अभिवचन परळीकरांना दिले होते.

दरम्यान केंद्राच्या मागील अर्थसंकल्पाच्या काळात धनंजय मुंडे यांनी या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी मंजूर करण्याबाबत विनंती केली होती, ती मान्यही झाली होती परंतु कोविड मुळे लागलेल्या निर्बंधांमध्ये या कामास आवश्यक निधी प्राप्त होऊ शकला नव्हता. त्यानंतर आता मा. नितीनजी गडकरी यांनी परळी शहर बायपासच्या या प्रलंबित कामासाठी ६० कोटी २३ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या वतीने मा. गडकरीजी यांचे आभार मानले आहेत.