• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

छत्रपती शिवराय संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे राजे-सुशेन महाराज नाईकवाडे

◼️छत्रपती शिवराय संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे राजे-सुशेन महाराज नाईकवाडे

◼️सारसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

◼️ND NEWS | लातूर(प्रतिनिधी विकास राठोड)

बहुजन प्रतिपालक,कुळवाडी भूषण,रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजासारखा युगपुरुष महाराष्ट्रात जन्माला येणे हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे. गेली साडेतीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे राजे ठरले आहेत. पिढ्या मागून पिढ्या येतात आणि जातात पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येक पिढ्यामध्ये आदर आणि प्रेम रुजत राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून ते संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. असे प्रतिपादन प्रसिद्ध शिव व्याख्याते सुशेन महाराज नाईकवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या सारसा ता. लातूर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रसिद्ध शिव व्याख्याते सुशेन महाराज नाईकवाडे, ह.भ.प.लालासाहेब पवार, सरपंच ज्योती हनुमंत भिसे, उपसरपंच परमेश्वर भिसे, पोलीस पाटील अर्जुन कदम, माजी सरपंच बन्सी भिसे, ग्रामपंचायत सदस्य पोपट भिसे, गोविंद तांबारे, बब्रुवान पवार, अशोक अडसूळ, काका आवशंक, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष भिसे व सर्व सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.

    पुढे बोलताना सुसेन महाराज नाईकवाडे  म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तरुण दारू पिऊन नाचतात. यामुळे छत्रपती शिवरायांच्या जयंतीत विटंबना होते. हे दुर्भाग्य आहे. छत्रपती शिवरायांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा ती शिवचरित्र वाचून साजरी केली पाहिजे. शेतकरी सुखी तर राजा सुखी, शेतकरी गरीब तर राजा गरीब, राजा गरीब तर राज्य गरीब, हीच शिवशाहीची अर्थनीती होती. श्रमजीवी वर्ग हा खरा उत्पादक आणि अर्थकारणाचा कणा आहे. हा शिवाजी राजांचा संदेश आपल्या देशात नोकरशहा आणि राज्यकर्ते विसरले की काय? असा प्रश्न पडतो. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका अशी ताकीद त्या काळी छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्याला दिली होती. असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे अरविंद कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नामदेव भिसे यांनी मानले.या कार्यक्रमास सारसा व पंचक्रोशीतील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

@@@@@@@
*छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाचे अनावरण*

सारसा येथील मुरुड अंबाजोगाई मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नवीन एलईडी नाम फलकाचे अनावरण महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव व्याख्याते कीर्तनकार सुशेन महाराज नाईकवाडे, हभप लालासाहेब पवार, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष संतोष भिसे, शिवव्याख्याते शाम भोळे, दै.लोकमत लातूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अशपाक पठाण,  दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार जगदीश शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.