• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महावितरणच्या हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर ;नागपिंपरी येथे मंजूर झालेले सब स्टेशन त्वरित कार्यान्वित करा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार —प्रदीप मुंडे

परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची महावितरणकडे केली मागणी!

ND NEWS | परळी वैजनाथ

लाईटचे होल्टेज पुरत नसल्यामुळे नागापूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मौजे मांडेखेल- नागपिंपरी ता. वैजनाथ जि .बीड येथे चार वर्षापासून मंजूर असलेले सबस्टेशन केंद्र सुरू करावे अशी मागणी नागापूर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांनी महावितरण कडे केली असून पंधरा दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मौजे मांडेखेल-नागपिंपरी येथे सबस्टेशन साठी महावितरण कडून जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या भागातील मांडेखेल, अस्वलआंबा, नागपिंपरी, तडोळी ,वाघाळा, बोधेगाव, कावळ्याचीवाडी ,माळहिवरा, आणि सोनहिवरा या गावासाठी हे सब स्टेशन फायदेशीर ठरणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे लाईटचे होल्टेज पुरत नसल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. माहे सप्टेंबर ते जुलै या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी होल्टेज अभावी चालत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांच्या पिकांना पाणी असून सुद्धा देता येत नाही अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर ओढावली आहे.

नागापूर सब स्टेशनवर मांडेखेल, अस्वल आंबा,नागपिंपरी ,माळहिवरा, तडोळी, बोधेगाव, कावळ्याचीवाडी, वाघाळा आणि सोनहिवरा या गावातील पाणीपुरवठा योजना चालतात मात्र होल्टेज पुरत नसल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याचे पाणी ग्रामपंचायतींना उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागते. यासंदर्भात महावितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत मात्र त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मांडेखेल – नागपिंपरी येथे सब स्टेशन होऊ शकले नाही.

सदरील प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असून या संदर्भात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. येत्या पंधरा दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास नागापूर परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असून त्याची सर्वस्व जबाबदारी महावितरण कार्यालयाची असेल असे त्यांनी म्हटले आहे.