• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मी शिवबाचा सैनिक होतो हे स्फुर्ती गीत लवकर शिवभक्तासाठी ध्वनीमुद्रीत होणार :-दया होळंबे

परळी दि.९(प्रतिनिधी)

रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना स्फुर्ती आणि प्रचंड उर्जा देणारा आहे. तोच जाज्वल्य इतिहास परळी वैद्यनाथ तालुक्यातील मौजे यळंब येथील पटकथा लेखक,  गीतकार,   हिन्दी अनुवादक, ऍड फिल्म मेकर, कंटेंट रायटर डॉक्युमेंटरी फिल्म मेकर.दया होळंबे यांनी मी शिवबाचा सैनिक होतो हे स्फुर्ती गीत शब्दबद्ध केले आहे. येत्या शिवजयंती निमित्त हे स्फुर्ती गीत शिवभक्तासाठी ध्वनी मुद्रीत होणार असल्याची माहिती दया होळंबे यांनी एका प्रसिध्दी प्रञकाद्वारे दिली आहे.

ते स्फुर्ती गीत पुढीलप्रमाणे आहे.
एक काळ होता जेव्हा जुलमी मोगलांच्या आणि शाहयांच्या क्रूर निर्दयी सैन्यान थैमान घातलं होतं..
आपण आपल्याच भूमीत हताश कैदी होतो..
त्यांना वाटेल तसं वाटेल तेव्हा आपण सोसायचं होतं झेलायचं होतं..

ज्यावेळी घोड्यांच्या टापांचा आवाज जीवाचा थरकाप उडवत असायचा
त्यावेळी जणू काळच खडबडून जागा झाला..
सह्याद्रीच्या कणखर काळजातून एक तेजस्वी किरण जणू स्वतंत्र प्रकाश घेऊन अवतरला
रायरेश्वरावर रक्ताहुतीची शपथ घेऊन तेव्हापासूनच मी शिवबा सोबत होतो

मी शिवबाचा सैनिक होतो ll

तलवार दांडपट्टा भाला ढाल अन दगड गोटे घेऊन मी केव्हाचा सज्ज होतो..
निर्दयी निगरगट्ट जुलमी धिप्पाड दुश्मनांचे प्राण घ्यायला अन् शिवबाच्या स्वराज्य स्वप्नासाठी प्राण द्यायला..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

सह्याद्रीच्या घनघोर जंगलात कडेपठारात तीव्र वावरण्यास मी सक्षम होतो
हिंस्र पशु असो वा धिप्पाड दुश्मन त्याचा क्षणार्धात निःपात करण्यास मी भक्कम होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

त्या तेजस्वी शूर चाणाक्ष अशा मानवी शिवबाच्या स्वराज्यप्रणाची प्रेरणा माझ्या प्रत्येक श्वासात होती..
माझ्या मायभूमीची मुक्ती ती केवळ माझ्या ध्यासात होती..

कारण मी शिवबाचा सैनिक होतोll

माझ्या शिवबान मला ना कधी जात विचारली ना वर्णपात विचारली
त्यामुळेच तर मी कोंढाण्यावर तानाजी सोबत होतो पावनखिंडीत बाजी सोबत होतो कधी बहिर्जी तर कधी हंबीररावा सोबत होतो
अफाट शौर्यान लढता लढता बाजी पडला तानाजी पडला तरी मी लढतच होतो.. शत्रूच्या चिंधड्या उडवत रक्तामासाचा चिखल तुडवत मी राजाच्या स्वराज्यासाठी च जगतही होतो अन् मरत ही होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

माझ्या राजान परस्त्रीला मातृवंदनाच दिली आणि राजाचा तो आदेश शिरसावंद्य मानत आम्हीही कायम मातृवंदनाच केली
कुठल्या धर्माचा विरोध करू नका धर्मातल्या अधर्म्यांना चोप दिल्याशिवाय सोडू नका हाच स्वराज्य विचार मानत मी राजाच निर्मळ मन प्रवाहित करत होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

मी राजं होतं तेव्हाही होतो आणि राज गेल्यावरही कोसळून न जाता दुप्पट  त्वेषान शत्रूची कत्तल करत होतो .
माझ्या राजाच्या स्वराज्य रक्षणाची पताका दिनरात फडकावत होतो..
मी राजं संभाजीच्या बलदंड शौर्यातही होतो अन् त्यांच्यानंतरही पोटात जाळ घेऊन सूड घेण्यास संताजी धनाजी सोबत ही होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

मी शाहुंसोबतही होतो अन् थोरल्या पेशव्यांच्या साथीला अटकेपार झेंडा लावण्यात चपळ तेजस्वी आश्वासारखा दौडत होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

मी पानिपतावर ही उपाशीपोटी जरी अर्धशक्तीने तरी पूर्ण हिमतीने लढलो होतो..
जिंकलेल्या त्या अब्दालीला कफल्लक होऊन जाताना पाहत होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

मी ब्रिटिशांशीही लढलो वर्षानुवर्ष अन आप्तस्वकीयांशीही..
मी राजर्षी शाहूंच्या समन्यायी प्रोत्साहणातही होतो अन् फुलेंच्या सुधार संघर्षात ही..मी भिमराया सोबत पोटतिडकिन अन्याय झुगारून चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही होतो अन् भारताच्या संविधानाचा आत्मा बनण्यातही होतो..

कारण मी शिवबाचा सैनिक होतो ll

आज मी सिलिकॉन व्हॅलीतही आहे आणि ऑक्सफर्ड हॉवर्डच्या संशोधनातही..
मी पोशिंद्याच्या नांगरातही अन निधड्या छातीने सीमेवर तैनात भक्कम बहाद्दर जवानातही अन खाकीच्या कर्तव्याने रातनदीन उन्हातानात महानगरात गावपाड्यासह दुर्गम जंगलातही तसाच मी चांगला समाज विचार असणाऱ्या तुमच्या आमच्यातल्या सच्चा असण्यातही..
मी कालही होतो आजही आहे अन भविष्यातही असेन रयतेच्या राजाचा शूर मानवी विचार घेऊन..
सांगेन मी ठणकावून ही असो वा ती कुठलीही शाही चालायची नाही रयतशाही सोडून कारण मी शिवबाचा सैनिक होतो आहे आणि राहणार.
-:लेखक :-
दया होळंबे
पटकथा लेखक,  गीतकार,   हिन्दी अनुवादक, ऍड फिल्म मेकर, कंटेंट रायटर डॉक्युमेंटरी फिल्म मेकर.