• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आपलेपणा जपणारा माणूस- पंढरीनाथ कराड

शब्दांकन : अनंत अप्पाराव मुंडे

आपलेपणा जपणारा माणूस- पंढरीनाथ कराड

सृष्टीच्या निर्मितीपासून मानवी जीवनाचे चक्र हे अनादी अनंत काळापासून अविरतपणे फिरत आले आहे .
ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे “उपजे ते नासे – नासे ते पुनरुपी दिसे – हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा…येणेप्रमाणे सजीवांचे जीवनचक्र हे सातत्याने फिरते आहे.
सृष्टीच्या या जीवन चक्रात सर्वात श्रेष्ठ हा मानव देह….
कारण “तैसे येणेचि शरीरे – शरीरा येणे सरे – किंबहुना येरझारे चिरा पडे ” या नरदेहाने आपण याची देही याची डोळा ‘असाध्य ते साध्य ‘ करू शकतो.
असे असले तरीही मानवी शरीर हे “नश्वर” आहे तर आत्मा हा “अविनाशी” आहे.
जोपर्यंत आपला पृथ्वीतलावरचा मुक्काम आहे तोपर्यंत ईथे रहायचे आणि एक दिवस या जगनियंत्याच्या मर्जीप्रमाणे दिगंताच्या प्रवासाला निघून जायचे.
पण मानवी आयुष्य मिळाल्यानंतर आपल्या चांगुलपणाने आपला इथला प्रवास कसा व्यतीत करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे.
हे एवढे सांगायचे,बोलायचे कारण म्हणजे काही माणसे आपल्या आयुष्याच्या प्रवासात ‘या काळाच्या भाळावर’ आपला वेगळा ठसा उमटवून जगत असतात,
असेच माझ्या वाकागावचे (बप्पा) पंढरीनाथ रामन कराड (दुकानदार) हे आपल्यातून नुकतेच कायमचे निघून गेले आणि मन अगदी गहिवरून आले.
पंढरीनाथ कराड म्हणजे आमच्या वाका गावचे तीन पिढ्यांचे दुकानदार…
म्हणजे त्यांची स्वतःची, आमची,आणि आमच्या मुलांची नवीन पिढी…
या सगळ्यांच्या मनावर दुकानदार बप्पा हे नाव अगदी आपलेपणाने कोरल्या गेलेलं आहे.
गावाबरोबर जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण करतानाच बप्पांनी आयुष्यभर माणुसकी अन् आपलेपणाची सतत देवाणघेवाण केली.
इतरांच्या तुलनेत बप्पांची दुकानदारी आयुष्यभर टिकली नव्हे तर त्यांनी ती स्वतःहून इमानदारीने टिकवली.
पांढरे शुभ्र धोतर त्याच लेहजाचा खमीज, नीटनेटक्या विंचरलेल्या डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी आणि गळ्यात टपोरी तुळशीची माळ, कपाळावर अबीरबुक्का अन् अष्टगंधाचा मोठा टिळा …..
बाह्यरूपाने चमकदार दिसणारा हा बप्पांचा नीटनेटकेपणा अंतर्मनातूनही तेवढाच सोज्वळ आणि पारदर्शक असायचा….
गावच्या वेशीतअगदी पहिलेच घर बप्पाचे …
त्याकारणाने पहिल्यापासूनच बप्पांचा सर्व गावातील नागरिक, माता – भगिनी अन् अबालवृद्धांशी संपर्क यायचा .
मोठ्यांना आदबीने रामराम, समवयस्कांची अस्तेवाईकपणे चौकशी ,
आमच्यासारख्या पोरांची ख्याली- खुशाली ते दररोज न चुकता विचारायचे .
समोरचा न बोलताच पुढे निघाला तर बप्पा त्याला स्वतःहून हटकून बोलतं करायचे. स्वतः तर मनमोकळेपणाने ते वागायचेच पण समोरच्याला सुद्धा आपलं मन मोकळं करायला भाग पाडायचे .
यातून माणुसकीची विण घट्ट होत जायची आणि आपलेपणा वाढायचा .
“आपलेपणात कमीपणा नसतो ” ही जणू शिकवणच बप्पांनी सर्वांच्या मनामध्ये अगदी सहजपणे आणि अलगदरीत्या रुजवली.
गावातील स्वार्थाने बरबटलेल्या व एकमेकांना जातीपातीत बांधून ठेवून आपला राजकीय हेतू व स्वार्थ साध्य करून गावातील निर्मळ वातावरण दूषित करणाऱ्या प्रवृत्तींचा बप्पांवर कधीच परिणाम झाला नाही.
आपला – परका न करता ते सर्वांशी आपलेपणानेच वागायचे.
मला आठवतंय…काही वर्षांपूर्वी बिनविरोध सरपंच करायच्या वेळी सर्वांनी बप्पांचे नाव एक मुखाने पुढे आणले पण त्यांच्याच अगदी जवळच्या विघ्न संतोषी माणसांनी याच्यात खोडा घातला अन् बप्पांची सरपंच होण्याची संधी कायमची हुकली.
निवडणुकीपुरते राजकारण अन् एरवी सदोदित माणुसकीचे समाजकारण करत बप्पांनी कधीच माणसा माणसात दरी निर्माण होऊ दिली नाही.
तसेच निर्माण झालेली दरी मिटवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असायचा.
आम्ही कळते व्हायच्या आधीपासूनच बप्पा स्वतःच्या घरी तुकाराम बिजेच्या निमित्ताने “तुकाराम चरित्र” ही पोथी लावायचे. ही परंपरा त्यांनी आजीवन अखंडितरीत्या चालवली .यातून गावातील माझ्यासारख्या पोरांच्या मनात परमार्थाची खरी रुजवण झाली अन् आम्ही परमार्थिक क्षेत्राकडे वळल्या गेलो. तेव्हापासूनच आमच्या मनात खरी संस्काराची पेरणी झाली हे कटाक्षाने नमूद करावे लागेल.
नवतरुणांनी मंदिरावर आले पाहिजे त्यांना रामायण वाचनाची व सांगण्याची आवड लागली पाहिजे यासाठी बप्पा नेहमी आग्रही असायचे.
सध्या मी परळीलाच राहायला असल्याने मला जर एखाद्या दिवशी उशीर झाला तर ते आग्रहाने म्हणायचे आज उशीर झालाय आज थांबा व रात्री पोथी वाचून, सांगून उद्या सकाळी परळीला जा .
अखंड हरिनाम सप्ताहात सुद्धा बप्पांचा ठळक सहभाग असायचा. आपण उजेडात व आपला देव अंधारात हे त्यांना कधीच पटायचे नाही म्हणून हनुमान मंदिरावर अखंड नंदादीप तेवत राहिला पाहिजे यासाठी मंदिरावरील दिवाबत्तीसाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले योगदान दिले.
कुठल्याही प्रसंगी कधीच बप्पांनी टोकाची भूमिका घेतली नाही. ‘पडती बाजू घेऊन आपले जीवन सुखाने जगले पाहिजे’ यासाठी त्यांची तळमळ असायची.
बप्पांना चार मुले व चार मुली… सर्वांचाच अगदी संपन्न परिवार…. सर्वजण आपापल्या परीने बाप्पांची काळजी घेत असंत ,तरीही बप्पा शेवटपर्यंत यातून स्वावलंबी राहिले.
अलीकडच्या काळात त्यांची लहान मुलगी छकुबाईने त्यांची विशेष सेवासुश्रुषा केली.
बप्पांनी आयुष्याची नव्वदी अगदी निरामयपणे गाठली पण गेल्या काही वर्षात बप्पांना श्वसनाचा विकार जडला होता.
आपली धर्मपत्नी बारा वर्षांपूर्वी सोडून गेली तरी त्यांनी जगण्यावरची आपली इच्छाशक्ती थोडीही ढळू दिली नव्हती.
अशात बप्पांना फुपूसाच्या विकाराने पुरते घेरले होते.
दरवर्षी गावात लक्ष्मण शक्ती होते, कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी बप्पांशी सल्ला मसलत असायची.
यावर्षीची लक्ष्मण शक्ती पुढयात आलेली अन बप्पांचे दुखणे वाढले.
जणू गावातील लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठीच ते थांबले अन् लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पार पडल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी अगदी चालत बोलत उठा उठी त्यांनी आपला ईहलोकीचा जीवनप्रवास संपवला….
” करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना” …
या काव्यपंक्तीप्रमाणे बप्पांना गहिवरल्या अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली .

अनंत आप्पाराव मुंडे