• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नव्या संसद भवनाला ‘ अनुभव मंटप अथवा बसवमंटप ‘ नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी

नव्या संसद भवनाला ‘ अनुभव मंटप अथवा बसवमंटप ‘ नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी
🟢 पंतप्रधानांना निवेदने पाठवावे : आत्मलिंग शेटे

प्रतिनिधी | परळीवैजनाथ

जगातील पहिल्या लोकशाही संसदेची मुहूर्तमेढ क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली. म्हणून दिल्लीत नव्याने निर्माण केलेल्या संसद भवनाला ” अनुभव मंटप अथवा बसवमंटप ” असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी देशातील सर्व समाजबांधवांनी आणि संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे आवाहन बीड जिल्हा लिगांयत संघर्ष समितीचे समन्वयक तथा पत्रकार आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.
बाराव्या शतकात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लोकशाही मूल्ये जपणाऱ्या निधर्मी समाज रचनेचा आरंभ ‘अनुभव मंडपाच्या ” रूपाने करून महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर सर्वप्रथम एक आदर्श ठेवला.म्हणूनच ते जगातील ” पहिले महात्मा ” ठरले. मंगळवेढा प्रांतातील बिज्जळ राज्याचे प्रधानमंत्री झाल्यानंतर अनुभव मंटप या नावाने लोकशाही संकल्पनेचा शुभारंभ त्यांनी केला.सर्व धर्मियांना एकत्र करून निधर्मी तत्त्वज्ञानाची बीजे त्यांनी रोवली.जातीभेद नष्ट करण्याची समाजरचना मांडली,त्याच तत्वानुसार आज लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.
अशा युगप्रवर्तकांचा वैचारिक ठेवा भविष्यात सदैव स्मरणात राहण्यासाठी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाला अनुभव मंटप अथवा बसवमंटप असे नामकरण झाले पाहिजे.यासाठी कर्नाटकातून खूप मोठ्या प्रमाणात उठाव सुरू झाला आहे.त्याची सुरूवात बसव तत्व प्रसारक धर्मगुरूंनी केली आहे.महाराष्ट्र,आंध्र, तेलंगणा,गोवा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वीरशैवांतील अठरापगड समाज बांधवासह लिंगायत आणि बसवप्रेमींकडून याबाबत पाठपुरावा होणे ही काळाची गरज आहे.
त्यासाठी समाजातील बसवप्रेमीं संघटनांनी आपली निवेदने पंतप्रधान कार्यालयास पाठवावीत.सर्व पक्षीय खासदार,आमदार,सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहाराची मोहीम गतीमान करावी. असे आवाहन परळी समाचार चे संपादक तथा बीड जिल्हा लिगांयत संघर्ष समितीचे समन्वयक आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.