• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 410 कोटींची मदत

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत

जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी अनुदान, धनंजय मुंडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

मुंबई (दि. 17) – बीड जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदतीची घोषणा केली असून, यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी मराठवाड्यात सर्वाधिक 410 कोटी 22 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनास पंचनामे शासनास सादर करून मदतीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने शेतकऱ्यांना मदतीपोटी अर्थसहाय्य करण्याची मागणी केली होती.

या मागणीला यश आले असून, राज्य सरकारने आज सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील 10 जिल्ह्यांना 1286 कोटी रुपयांची मदत देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला असून यामध्ये बीड जिल्ह्यातील 3 लाख 51 हजार 634 शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी 410 कोटी 22 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या मदतीच्या घोषनेमध्ये प्रचलित दरांच्या दुपटीने मदत केली जाणार असून जिरायत पिकांना 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे तसेच बागायती पिकांना 3 हेक्टरच्या प्रमाणात प्रति हेक्टरी 27 हजार रुपये प्रमाणे आणि बहुवार्षिक पिकांना 3 हेक्टरच्या प्रमाणात प्रति हेक्टरी 36 हजार रुपये याप्रमाणे मदत वितरित करण्यात येईल.

धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारने ही मदत दिवाळी पूर्वी किंवा ऐन दिवाळीत मिळावी यासाठी आग्रही मागणी केली होती, मात्र उशिरा का असेना परंतु बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.