• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विनोद तावडे: प्रकाश जावडेकर यांच्याकडे मोठी जबाबदारी: पंकजा मुंडेंकडे पुन्हा सहप्रभारीपद

ByND NEWS INIDIA

Sep 9, 2022

 

विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे मानण्यात येते आहे. बिहारमध्ये नुकतेच नितीश कुमार यांनी राजद सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. अशा स्थितीत विनोद तावडे यांना हरियाणानंतर आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदही देण्यात आलेले आहे.

प्रकाश जावडेकर यांच्याकडेही मोठी जबाबदारी

तर केंद्रात अनेक मंत्रीपदे सांभाळलेले प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून त्याठिकाणी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचा शिरकाव करण्यासाठी जावडेकरांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

पंकजा मुंडेंकडे पुन्हा सहप्रभारीपद

2020 साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतो आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.