• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विम्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

बीड ।दिनांक ०९।
पिकांचे नुकसान होऊनही २०२० चा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही, आता कसलीही आकडेमोड न करता सरसकट विमा द्यावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. विम्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी असल्याचेही त्या म्हणाल्या.

जिल्हयात सन २०२० साली झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याची नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक होते पण अद्यापही विमा मिळाला नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. हा पिक विमा सरसकट द्यावा यासाठी जागतिक महिलादिनी महिला व पुरूष शेतकऱ्यांवर जिल्हयात ठिक ठिकाणी ‘आक्रोश’ आंदोलन करण्याची वेळ आली, सत्तेत बसलेल्या लोकांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले हे दुर्दैव आहे असे पंकजाताई म्हणाल्या.

विमा कंपनीने आडमुठेपणा करत अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती ऑनलाईन करण्यास सांगितले परंतू जोरदार पाऊस आणि वीजेचा खोळंबा यामुळे शेतकऱ्यांना तशी नोंद करता आली नाही, ही नोंद ऑफलाईन पध्दतीने स्विकारता आली असती पण कंपन्यांनी याला प्रतिसाद दिला नाही परिणामी शेतकरी वंचित राहिला, त्यामुळे कंपन्यांनी आता विम्याची रक्कम सरसकट द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.