• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गुरूंनी करून दाखवलेला कार्यक्रम मी पण करून दाखवला, मीही कच्च्या गुरूचा चेला नाही – धनंजय मुंडे

  • गुरूंनी करून दाखवलेला कार्यक्रम मी पण करून दाखवला, मीही कच्च्या गुरूचा चेला नाही – धनंजय मुंडे

ह्या सगळ्या परिस्थितीमधून मी गेलोय – धनंजय मुंडेंनी केल्या भावना व्यक्त

अजितदादांनी वेळोवेळी अपमान आणि बदनामी सहन केली

पवार साहेबच आमचे विठ्ठल – मुंडेंची स्पष्टोक्ती

सरकारसोबत राष्ट्रवादी म्हणून आलोत, महाराष्ट्राच्या जनतेची कामे करून दाखवू

मुंबई (दि. 05) – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मी माझ्या कौटुंबिक वारशाचे राजकारण बाजूला ठेऊन पवार साहेबांच्या सान्निध्यात अजित दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. घरात फूट पडणे, पक्षात फूट पडणे, त्यातून होणाऱ्या मानसिक वेदना यातून मी स्वतः याआधी गेलो आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली, याचाही विचार केला गेला पाहिजे.

मला आयुष्यात मोठी संधी अजित दादांनी दिली, त्यांच्याच कडे पाहून मी पक्षात आलो, दादांना वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अनेक वेळा अन्याय सहन करावा लागला. साहेबांनी टाकलेल्या तथाकथित ‘गुगली’ यशस्वी करण्यासाठी अनेकवेळा दादांना पुढे केले गेले, त्यातून त्यांना नाहक बदनामी सहन करावी लागली, हेही आता सहन शिलतेच्या पलीकडे गेले आहे, असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी दुपारचे भाजपसोबत स्थापन झालेले सरकार, ही देखील एक गुगली नाही ना? असा मिश्किल सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

शरदचंद्र पवार साहेब हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशीष्ट बडव्यांनी घेतलं आहे, त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास दिवसरात्र काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला होतो आहे, हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं, असंही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान ‘ते’ तीन बडवे कोण, याबाबत नाव घेणे मात्र मुंडेंनी टाळले.

आम्ही भाजपसोबत सत्तेत सामील झालो असलो तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत. आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातल्या जनतेला निवडणुकांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी, जनतेची कामे करण्यासाठी आम्ही या सत्तेत सहभागी झालोत, असंही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांसह पक्षाचे अनेक आमदार, माजी आमदार, विविध जिल्ह्याचे अध्यक्ष, विविध आघाडीचे व फ्रंटल सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.