• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ-सहकार मंत्री अतुल सावे

  • स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ-सहकार मंत्री अतुल सावे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथीचा पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-

पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांचे जीवन व पत्रकारिता आदर्श असुन मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पत्रकार प्रबोधिनी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी बीड जिल्हाधिकार्‍यांना सुचना देऊ असे आश्‍वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले. तर पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावुन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि. 7 एप्रिल रोजी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत, त्यांना न्याय मिळवून देणार्‍या पत्रकारांना पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. दैनिक मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील हॉटेल वर्षा इन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदूलाल बियाणी, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक जगदिश बियाणी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, मुंबईतील दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात यंदा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात उत्कृष्ट कार्य करणार्‍या जनसंपर्क अधिकार्‍यांनाही ‘कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विभागनिहाय या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभू गोरे यांनी केले. यात त्यांनी पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले.
पुढे बोलतांना ना.अतुल सावे म्हणाले की, पत्रकारांचे महत्त्व राजकीय व्यक्ती शिवाय दुसर्‍या कुणाला एवढे माहीत नसते. सकाळी वर्तमानपत्र आले नाही तर दिवसाची सुरुवात व्यवस्थित होत नाही. अशा या पत्रकारांच्या काही समस्या मान्यवरांनी येथे मांडल्या. त्यासंबंधी लेखी निवेदन दिल्यास मुंबईला बैठक घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमार्फत हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वृत्तपत्र व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवल्याबद्दल मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी तथा संपादक जगदीश बियाणी यांचे कौतुकही केले.
पत्रकारांचे अधिवेशन व्हावे-चंदुलाल बियाणी
दुसर्‍यांना न्याय मिळवून देणार्‍या पत्रकारांच्या स्वतःच्या देखील अनेक समस्या आहेत. या समस्या बाजूला ठेवून ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात. परंतु त्यांच्या समस्यांकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. त्यातील काही समस्या माझ्या सहकार्‍यांनी येथे मांडल्या आहेत. असे सांगत दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी बीड येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा मनोदय अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
मराठवाडा साथीत काम केल्याचा अभिमान – मुंडे
परळी शहरात चार दशकांपूर्वी स्वर्गीय मोहनलालजी यांनी दैनिक मराठवाडा साथीची मुहूर्तमेढ रोवली. मोहनलालजी नेहमीच विकासाच्या कामात पुढे असायचे, मी देखील अंबाजोगाईतून दैनिक मराठवाडा साथीत काम केले आहे. याचा मला अभिमान आहे. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की सत्ता आल्यानंतर माणूस कळतो. पत्रकारांच्या पेन्शन साठी अटी शर्ती अधिक लावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अधिस्वीकृती मिळण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न असेल किंवा चक्रवाढ पद्धतीने जाहिराती देण्याचा विषय असेल, आदी अनेक विषय आहेत. ते सोडवण्याकरिता आपण सहकार्य करावे अशी विनंती ही त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे केली.
पत्रकारांसाठी एखादे महामंडळ असावे – डोईफोडे
विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी देखील, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी लावण्यात आलेले क्लिष्ट नियम शिथिल करण्याबाबत मंत्री सावे यांच्याकडे मागणी केली. यासह आता विविध महामंडळ स्थापन झाली आहेत. यामुळे पत्रकारांसाठीही एखादे महामंडळ असावे असे देखील डोईफोडे म्हणाले.
या पुरस्कार सोहळ्यात पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक दयानंद माने, मुुंबईतील दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे, दैनिक लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे, युनिसेफ महाराष्ट्रचे राज्य सल्लागार तानाजी पाटील तर ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्काराने दैनिक आनंद नगरीचे संस्थापक संपादक शिवरतन मुंदडा व ‘कार्यगौरव’ पुरस्काने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्‍वर आर्दड आदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक मराठवाडा साथी बीड आवृत्तीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांनी केले. कार्यक्रमास मराठवाडा साथीचे कार्यालयीन व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे, माहेश्वरी गर्जनाचे संपादक चंद्रप्रकाश काबरा, प्रकाश वर्मा आदी उपस्थित होते.