• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अंबाजोगाई शहराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा अंबाजोगाई मध्येच जतन करा : ॲड.माधव जाधव

अंबाजोगाई शहराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा अंबाजोगाई मध्येच जतन करा : ॲड.माधव जाधव

बीड ( अंबाजोगाई ) | नितीन ढाकणे

अंबाजोगाई हे शहर मराठवाड्यातील पुणे म्हणून ओळख असणारे शिक्षण क्षेत्रातील एक नाव.परंतु या अंबाजोगाई शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पाहिल्यानंतर अंबाजोगाई शहर हे मध्ययुगीन कालखंडाच्या पूर्वीपासून यादवकालीन इतिहासाची परंपरा व वारसा असलेले एक शहर म्हणून याची ओळख आहे.अंबाजोगाई शहराला पूर्वी आम्रपुर-आम्रदेश- जयंतीका नगर – अंबाक्षेत्र-अंबा नगरी -मोमिनाबाद व त्यानंतर अंबाजोगाई असे इतिहासकालीन नावांची परंपरा असलेले अंबाजोगाई हे शहर.यादव साम्राज्यामध्ये सिंघनदेव यादव यांचे अधिपत्याखाली अंबाजोगाई शहराचा विकास झाला. यादव साम्राज्याची उपराजधानी अंबाजोगाई होती.सिंघनदेव यादव यांचे सेनापती खोलेश्वर यांनी अंबाजोगाई या ठिकाणी खोलेश्वर मंदिर तसेच संकलेश्वर मंदिर म्हणजेच बाराखांबी त्याचप्रमाणे जोगाईचे मंदिर,नृसिंह मंदिर,अमलेश्वर मंदिर व हत्तीखाना लेणी, जैन लेण्या इत्यादी ऐतिहासिक वारसा जोपासणाऱ्या पुरातन अशा भव्य कलाकृती असणाऱ्या वास्तूंची उभारणी केली होती.त्याचप्रमाणे जैत्रपाल यादव राजाच्या काळामध्ये आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे अंबाजोगाई शहरांमध्ये म्हणजेच अंबा नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते व त्याच काळात आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांनी मराठी भाषेचा विवेक सिंधू हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला.त्यामुळेच मराठीचे आद्य कवी म्हणून मुकुंदराज स्वामी यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे व आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांनी पवनविजय,मूलस्तंभ,पंचीकरण,परमामृत ग्रंथाची रचना ही सुद्धा अंबाजोगाई या ठिकाणीच केली. आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचा कालखंड इसवी सन ११२८ ते १२०० हा होता.त्याचप्रमाणे दासोपंत यांनी इसवी सन 1551 ते 1616 या काळात दासोपंतांनी सर्वाधिक काव्य निर्मिती केली व पाच लाख ओव्या दासोपंतांनी तयार केल्या.पासोडी,गीतार्थ बोध व ग्रंथराज व दत्तात्रय महात्मे रचना दासोपंतांनी अंबाजोगाई शहरांमध्येच लिहिल्या. दासोपंतांची पासोडी हे ४०फूट लांब व ४ फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण अध्यात्म ज्ञानाचा विषय अतिशय सुंदर पद्धतीने चित्राकृतीतून लिहिलेला आहे.त्यालाच पासोडी असे म्हटले जाते.खोलेश्वरचे प्राचीन मंदिर, हत्तीखाना येथील प्रभावी सभा मंडप, गुहा ,जयवंती नदीकाठी असलेल्या गुहा,चौरसाकृती संपूर्ण कोरीव काम ,जोगाई देवीचे माहेरघर,हत्तींची भव्य शिल्पे 23 फूट उंच व १२ फूट लांबीचे हत्तीचे शिल्प,हेमाडपंथी शैलीचा नमुना असलेल्या वास्तू,त्याचप्रमाणे अंबाजोगाई शहर हे देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून अंबाजोगाई शहराची ओळख आहे.अंबा नगरीच्या परिसरामध्ये एकूण आठ शिलालेख सापडतात १)महाकुमार सिंघनदेव प्रथम चणई शिलालेख इसवी सन 1080 (२)कल्याणी चालूक्य नृपती जगदेव मल्ल दुसरा चा शिलालेख इसवी सन 1139
(३) महामंडलेश्वर उदयदित्याचा हत्तीखाना शिलालेख इसवी सन ११४४
(४)सिंगनदेव प्रथम चा संगीन मशीद शिलालेख इसवी सन 1188
(५)गणेश मंदिर चौभारा तेरावे शतक (६)संकलेश्वर बाराखांबी शिलालेख १२२८ (७)खोलेश्वर मंदिरातील लक्ष्मीचा शिलालेख १२४० (८) योगेश्वरी मंदिरातील तीर्थ शिलालेख
अशाप्रकारे अंबाजोगाई शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणारे हे शिलालेख व आंबेजोगाई शहराच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भर घालणारे अनेक महापुरुष या अंबाजोगाई शहरांमध्ये होऊन गेले.त्यापैकी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व 1938 पासून केले.111 दिवसाचा तुरुंगवास त्यांनी भोगला.पहिली राष्ट्रीय शाळेची स्थापना स्वामी रामानंद तीर्थांनी केली.हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ स्वामी रामानंद तीर्थस् यांनी लिहिला.अशा प्रकारे अंबाजोगाई शहराचा पुरातन काळातील इतिहास व तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा हा आजही या ठिकाणी जिवंत असताना पुरातत्त्व खाते उत्खननाच्या नावाखाली अंबानगरीचा हा ऐतिहासिक,धार्मिक व सांस्कृतिक वारसा असणारे शिल्प व मुर्ती हे अंबानगरीतून हलवून ते तेर येथील वस्तुसंग्रहालयामध्ये घेऊन जात आहेत.हे ताबडतोब थांबले पाहिजे व आंबानगरीचा सांस्कृतिक इतिहास व ऐतिहासिक वारसा याचा जिवंत देखावा निर्माण करणारे शिल्प,कलाकृती व त्याचप्रमाणे असणाऱ्या मूर्ती या अंबाजोगाई शहरांमध्ये जतन केल्या पाहिजेत.त्यासाठी शासनाने आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन अंबाजोगाई या ठिकाणी एक वस्तू संग्रहालय उभे करावे व त्या ठिकाणी अंबाजोगाईचा हा वारसा जतन करून ठेवावा ही नम्र विनंती….
आपलाच
ॲड.माधव जाधव
९८२२०४२७७४