• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होणार बाल संस्कार केंद्र: आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन

◼️परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होणार बाल संस्कार केंद्र: आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन

बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे

◼️ND NEWS|  परळी वैजनाथ, प्रतिनिधी…..

आजकाल मोबाईल, कार्टून, गेम्स, व्हीडीओ या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना गोष्टींतून संस्कार देणे अनेकदा कठीण होते. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टीतून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजविली जात असे. आता ही सहज बाबही मागे सरत आहे. हाच हेतू समोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे.आ.धनंजय मुंडे यांच्याहस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.संस्कार केंद्र ही काळाची गरज असुन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजू, प्रा.बाबासाहेब देशमुख, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, आयोजक बाजीराव (भैय्या)धर्माधिकारी, शिवसेना(उद्धव ठाकरे) तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, स्वामीसर, रमेश चौंडे,अभय लोणीकर, संस्कार केंद्र संचालक अतुल नरवाडकर आदी उपस्थित होते.
स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचींग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुढी पाडव्यापासून “बाल संस्कार केंद्र” सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांची बालमनं जपून त्यांच्या कलेने घेऊन संस्कारमूल्य रुजविण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्र लक्षात घेत त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या केंद्राद्वारे होणार आहे.या बाल संस्कार केंद्रामध्ये नोंदणी विनाशुल्क असेल.बाल संस्कार केंद्रामध्ये भगवद्गीता, देशभक्तीपर गीत,उत्सव संस्कृती, संगणक प्रशिक्षण, अन्न व पाणी बचत,रामरक्षा, बोधपर श्लोक, बोधकथा, शौर्य गीते व कथा, योग-प्राणायाम,तंत्रज्ञान माहिती,भाषण कौशल्य,
ध्यान-साधना,पर्यावरण संरक्षण,भारतीय राज्यघटना, सामान्य ज्ञान,पसायदान,तज्ज्ञांचे मार्गदर्शन ,जीवदया,
वैदिक गणित,परळी दर्शन, कार्यालयीन माहिती, बौध्दिक खेळ, लँग्वेज लॅब आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
इयत्ता ३ री ते ७ वी वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी केंद्रात प्रवेश असेल.स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह श्री संस्थान काळाराम मंदिर, अंबेवेस, परळी वैजनाथ येथे दर रविवार सकाळी १० ते १२ संस्कार वर्ग होतील. नोंदणीसाठी प्रा.श्री. अतुल नरवाडकर मो. ९४०३८८३११४ ९८५०५९०३६० यांच्याशी संपर्क साधावा.तसेच या केंद्राचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या)धर्माधिकारी व स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.