• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संजय राऊत विकृत सत्तेत राहण्यासाठी काहीही बरळत असतात: उदयनराजे भोसले

 

ND NEWS: सातारा : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राजे हे अनाजी पंतांचे चेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांचा संपूर्ण रोख माजी खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या दिशेने होता. थेट छत्रपतींच्या घराण्यावरच राऊत यांनी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. राऊत यांच्या टीकेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी खास आपल्या स्टाईलने समाचार घेतला आहे. निर्लज्जपणाची हद्द झाली, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.

लाज बाळगा

मागे याच संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले होते. त्यांची विकृती इतक्या टोकाला पोहोचली आहे. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोकं काहीही बरळत असतात. त्यांचं विधान हे राजकीय स्वार्थासाठी आहे. आता तर निर्लज्जपणाची हद्दच झालीय. काही विषय नसेल तर प्रत्येकवेळी राजघराण्यावर टीका केली जाते. पण लक्षात ठेवा. ज्या राजघराण्याविरोधात तुम्ही बोलत आहात, त्याच राजघराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. छत्रपतींच्या घराण्याचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.