• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

माय भूमीतील कौतुकाने व प्रोत्साहनाने सुवर्णकन्या भारवली

ByND NEWS INIDIA

Nov 14, 2022

श्रद्धाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याची आ.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्यासह परळीकरांची ग्वाही

श्रद्धाप्रमाणे खेळाडू घडण्यासाठी परळीत भव्य क्रीडांगण उभे करणार – आ.धनंजय मुंडे_स्वा

 

भिमान, सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतिक परळीची लेक ठरली याचा अभिमान- पंकजाताई मुंडे

नितीन ढाकणे | परळी वैजनाथ

परळी शहरात राहूनच श्रद्धा प्रमाणे उत्तुंग नावालौकीक करणारे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असलेले क्रीडांगण लवकरच परळीत उभे राहील. यासाठी नगर परिषदेने आठ एकर जागा आरक्षित केली असून भव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. तर स्वाभिमान सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतीक परळीची लेक बनल्याचा आपल्याला अभिमान असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने तिच्यासाठी ब्लँक चेक तयार केला आहे अशी घोषणा भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली. सुवर्णपदक विजेती श्रद्धा गायकवाड हिचा तमाम परळीकरांच्या वतीने शानदार सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर बोलत होते. एकप्रकारे या सुवर्णकन्येच्या नेत्रदीपक नागरी सत्कार सोहळ्यात परळीकरांकडून कौतुकाची “श्रद्धा”ओसंडली असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
परळीच्या कु. श्रद्धा रविंद्र गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत “स्केट बोर्ड” या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत आज सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव करण्यात आला आहे.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव झाला.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे भव्य नागरी गौरव सोहळा झाला.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा भारतीय खो-खो संघटना सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, अमेरीकेतील एम. आय. टी. विद्यापीठात निवड झालेला भारतातील एकमेव विद्यार्थी आकाश पोपळघट, बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख, परळीच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे,न.प.प्रशासक तथा मुख्याधिकारी एस.ए. बोंदर, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विविध मान्यवरांनी श्रद्धाचे कौतुक करत तिच्या पुढील कामगिरीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे अनेकांनी तिच्या पुढील कारकीर्दीसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे काही संस्थांच्या वतीने कार्यक्रम स्थळीच मदतीचे धनादेश देण्यात आले.शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा भारतीय खो-खो संघटना सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, अमेरीकेतील एम. आय. टी. विद्यापीठात निवड झालेला भारतातील एकमेव विद्यार्थी आकाश पोपळघट, बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, वैद्यनाथाच्या या परळीमध्ये श्रद्धेला महत्त्व आहे. या श्रद्धेपोटीच आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. श्रद्धा गायकवाड ने जागतिक पातळीवर आपल्या परळीचे नाव उंचावले असून तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत. श्रद्धा प्रमाणेच परळीत खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी परळीत भव्य क्रीडांगण उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नगर परिषदेने आठ एकर जागा सुद्धा आरक्षित केली असून या जागेवर भव्य दिव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ऑलम्पिक साठी श्रद्धाला सदिच्छा व्यक्त करताना तिच्या कारकिर्दीसाठी जे काही लागेल ते सर्वतोपरी देण्याचे दायित्व आपले असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, आपल्या परळीच्या लेकीने खरोखरच स्वाभिमान सन्मान व आत्मविश्वास याची शिकवण दिली आहे. याचे ती प्रतीक बनली आहे. परळी मध्ये अनेक श्रद्धा निर्माण व्हाव्यात यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत श्रद्धाची कीर्ती पोहोचवू. तिच्या भावी वाटचालीसाठी संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचे तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने श्रद्धा गायकवाडच्या कारकिर्दीसाठी कोरा चेक तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा गायकवाड नागरी गौरव समितीचे प्रमुख बाजीराव भैया धर्माधिकारी, नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केले. कार्यक्रमा मागची संपूर्ण भूमिका व आपण परळीकर म्हणून राजकारण, गट ,तट सर्व बाजूला ठेवत एकत्रित येऊन केलेला हा उपक्रम असल्याचे सांगितले. याप्रसंगी बहादूर भाई, व्यंकटेश शिंदे,वैजनाथ कळसकर सोपान ताटे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले. आभार प्रदर्शन वैजनाथ तांबडे यांनी केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड नागरी गौरव समितीच्या अजय जोशी,संजय सुरवसे,अनंत इंगळे,संजय कराड,नितीन रोडे,प्रा.विनोद जगतकर,रवी मुळे,जितेंद्र नव्हाडे,प्रा. शाम दासुद,बालाजी गायकवाड, के.डि.उपाडे, जितेंद्र मस्के,मुन्ना मस्के,रमेश मस्के,हनुमंत गायकवाड, आदीं सह सर्व सदस्य कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

*या संस्थांकडून अर्थिक प्रोत्साहन राशी सुपूर्द….*
विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी-५०,००० रु. ,संस्कार शाळा- ११,०००रु. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पतसंस्था- ११,००० रु.,पेंटवार कलेक्शन’ ५००० रु.