• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ तक्रार करावी! – किसान सभा

ByND NEWS INIDIA

Oct 13, 2022

शेतकऱ्यांनो आपली लढाई आपणच लढू आणि जिंकू यावर आत्मविश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. 

ND NEWS | परळी वैजनाथ:

सोयाबीन, बाजरी, काढणी समयी व काढणी पश्चात तसेच कापूस वेचणीस आलेला असताना बीड जिल्ह्यात 11 ऑक्टोबर पासून सर्व दूर विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी सुरू आहे. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा शासकीय यंत्रणांचा हवामान अंदाज असून अस्मानी-सुलतानी संकटांनी अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये या पावसाने आणखीनच भर घातली आहे. या पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, बाजरी इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून ते आणखीही जास्त प्रमाणात होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी हदबल, वैफल्यग्रस्त न होता आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसान संदर्भातील तक्रार 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे दाखल करावी. असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष काॅ. अजय बुरंडे यांनी केले आहे.

या अगोदर ऑगस्ट मधील पावसातील खंडामुळे 25% विमा अग्रीम मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी पात्र असताना त्या संदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली असतानाही; आणि अधिसूचना काढल्यानंतर एक महिन्याच्या आत पीकविमा अग्रीम देणे क्रमप्राप्त असतानाही विमा कंपनीने मात्र अपिलाद्वारे वेळ काढू धोरण स्वीकारून शेतकऱ्यांचा छळ मांडला. या अगोदर पेरणीपासूनच लागून राहिलेल्या पावसामुळे मशागतीची कामे होऊ शकली नाहीत. तणे वाढल्याने, पाणी साचून राहिल्याने, मुळकुज होऊन मर रोगांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्याने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असूनही अतिवृष्टी बाधित अनुदानापासून जिल्ह्याला वंचित ठेवण्यात आले. आणखी उत्पादन शेतातून घरी आलेले नसतानाच मोठ्या प्रमाणात पडलेले भाव ही गंभीर परस्थिती असतानाही या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी व शासनास याकडे लक्ष्य देण्यास वेळ नसल्याने शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. तरीही शेतकऱ्यांनी हताश न होता शेतकऱ्यांनी आपली लढाई आपणच लढू आणि जिंकू यावर आत्मविश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वर्षी सुरवातीपासूनच संकटांची श्रृंखलाच बीड जिल्ह्यातील शेतीवर शेतकऱ्यांना गळ्याचा फास बनत चालल्या आहेत. बीड जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. सुरवातीला सततच्या पावसाने, नंतर गोगलगायी, ढब्बू पैसा, या अकल्पित किडींचा प्रादुर्भाव, एलो मेझेस वायरसने पिकांची झालेली हानी, आणि पुन्हा पावसातील मोठ्या खंडामूळे नुकसानीत पडलेली भर तसेच पीक जागच्या जागी वाळणे या अज्ञात रोगाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात आता या परतीच्या पावसाने पून्हा कहर मांडला आहे. आसमानी संकटाशी जरी सामना करणे आपल्याला शक्य नसले तरी सुलतानशाहीला 2020 च्या पिक विम्यासारखी पळवाट ठेवायची नाही म्हणून पिक विमा सारखी पळवत ठेवायची नाही! म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या झालेल्या पीक नुकसानांची तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार 72 तासाच्या आत पिक विम कंपनी कडे द्यावी असे आवाहन अखिल भारतीय किसन सभेच्या वतीने कॉ.एड.अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.काशीराम सिरसाट, कॉ.दत्ता डाके, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.भगवान बडे,कॉ.जगदीश फरताडे,कॉ.कृष्णा सोळंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.