• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 साहित्यरत्न अण्णाभाऊ नावाच्या वादळाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

ByND NEWS INIDIA

Sep 27, 2022


ND NEWS I : परळी

सकल मातंग समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्याचबरोबर परळी शहरातील बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तात्काळ बसवावा या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संत भगवान बाबा चौक मार्गे हा मोर्चा तहसील कडे जाऊन धडकला. मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या शासनाने तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने एकमताने हा प्रस्ताव मंजूर करून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार घोषित करावा. परळीच्या बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकात पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. शासनाने या मागणीला गांभीर्याने घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.

सकल मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विक्रम मिसाळ, बबन कसबे, डॉ.माणिक कांबळे, कमलाकर मिसाळ, उत्तमराव मने, संपत वाघमोडे, कमलाकर मिसाळ, अभिमान मस्के, जितेंद्र मस्के, मिलिंद घाडगे, गोपाळ वैराळ, कल्पना कांबळे, यशोदा कसबे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने महिला व पुरुष या विराट मोर्चात सहभागी झाले होते. परळीच्या रस्त्यावरून निघालेल्या मोर्चाने आणि त्यात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.