• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल दुरुस्त करून केला परत

केज पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल दुरुस्त करून केला परत

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे

अंगावर खाकी वर्दी असलेला इसम हा राग, लोभ, सोडून जनतेची २४ तास जनतेची सेवा करीत असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीच्या मोहात पडत नाहीत त्यांना एकच मोह असतो. ते म्हणजे कायदा व सुव्यवस्था आणि तपास याचाच !

केज पोलीस उपविभागाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गंभीर आणि आवाहात्मक गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना बेड्या ठोकणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना मागील महिन्यात केज येथील उमरी रस्त्यात एक ॲपल-६ या कंपनीचा महागडा आय फोन सापडला. राजेश पाटील यांनी तो मोबाईल सुरू करून त्यातील संपर्क नंबर आधारे त्या मोबाईलच्या मालकाचा शोध घेण्याचे ठरवले; परंतु तो मोबाईल काही केल्या सुरू होत नव्हता. याचा तपास घेण्यासाठी त्यांनी केज मधील ओळखीच्या लोकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कळवून शहरातील कोणाचा मोबाईल हरवला असल्याची तक्रार दाखल आहे किंवा काही माहीती मिळते का ? याची माहीती घेतली. मात्र तशी काही माहिती त्यांना मिळाली नाही. मग पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्यातील एक पोलिस अधिकारी म्हणून त्यांना या बेवारस मोबाईलचा संशय वाढला आणि हा मोबाईल एखाद्या गुन्ह्याशी किंवा गुन्हेगाराशी तर संबंधित तर नसावा ना ! अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. म्हणून मग त्यांनी हा मोबाईल दुरुस्त करून त्याचा शोध घेण्याचे त्यांनी ठरविले. पाटील साहेब यांनी मोबाईल दुरुस्त केला मोबाईल दुरुस्त होताच त्यांनी त्यातील संपर्क नंबर यांच्या आधारे तपास केला असता हा मोबाईल केज तालुक्यातील कोठी येथील अजय रमेश डोंगरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी अजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती दिली. खात्री पटल्या नंतर त्यांनी अजय यास पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी अजय डोंगरे यांना मोबाईल परत करून त्याच्या स्वाधीन केला.

*कोट :-*

” हा मोबाईल खराब झालेला होता आणि केज सारख्या ठिकाणी त्याची दुरुस्ती शक्य नव्हती. परंतु या बेवारस व नादुरुस्त मोबाईलचा तपास लावायचाच हे मी पक्के ठरविले होते आणि त्याला यश आले.”
—– राजेश पाटील,
पोलीस उपनिरीक्षक, केज
————————————————–

” माझा हा मोबाईल ३० ते ३५ हजार रु किंमतीचा होता आणि तो मला पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांच्यामुळे परत मिळाला.”
—- अजय डोंगरे, कोठी
————————————————-
” माझे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी बेवारस सापडलेल्या मोबाईलचा तपास लावून तो मालकाच्या सुपूर्त केला या बद्दल मला राजेश पाटील यांचा सार्थ अभिमान आहे.”
— स.पो.नि. शंकर वाघमोडे,
पो. स्टे. केज