• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

झरीजामणी, वणीचा ही आढावा

यवतमाळ, दि. 6 : तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथे भेट देऊन पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी घाटंजी येथे भेट देवून तालूक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी आमदार इंद्रनील नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तहसीलदार पुजा माटोडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, न.प. मुख्याधिकारी अमोल माळकर, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुंभारे पोलीस निरीक्षक श्री. कराळे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम तहसील कार्यालयात तालूकास्तरीय कोरोना नियंत्रण समितीचा आढावा घेऊन जिल्हाधिका-यांनी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला भेट देवून उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल तसेच गावचे सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी गावक-यांना तपासणीबाबत जागृत करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाणा-या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी तसेच लवकर उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी टेस्टिंग वाढवावी. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.

नागरी भागात प्रभागस्तरीय व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांमार्फत ‘जाणीव – जागृती – जबाबदारी’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरीत 20 ऑक्सीजन बेडचे नियोजन करा. तसेच नविन कोविड केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले, आदींबाबत त्यांनी माहिती घेतली व अडीअडचणी जाणून घेतल्या.