• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराई शहरातील ५१ घरांच्या अंगणात ज्ञानवृक्ष; अट्टल महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष समाप्ती

ByND NEWS INIDIA

Jun 18, 2021

सुशील टकले : तालुका प्रतिनिधी

  ND NEWS :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गेवराई येथील र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या स्थापनेला १५ जूनला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी माजी राज्यमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी तसेच तत्कालीन संस्था पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या शिक्षणप्रेमी मंडळींनी घेतलेल्या अथक परिश्रमाला अभिवादन करण्यासाठी गेवराई शहरातील ५१ घरांच्या अंगणात ज्ञानवृक्ष जोपासन्याच्या हेतुने पन्नास वर्षपूर्ती निमित्त उपक्रम हाती घेण्यात आला. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या ज्ञानवृक्ष अंगणी उपक्रमाचे उद्घाटन गेवराई येथील सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यापूर्वी एक मे रोजी अट्टल महाविद्यालयाच्या वतीने जनावरांसाठी पाण्याच्या कुंड्या गेवराई शहरातील मोक्याच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. त्या कुंडीत पाणी भरण्याची जबाबदारी शेजारील नागरिकांनी घेतली होती. तसेच पक्षांसाठी दाणे व पाणी पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले.
महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मागील शैक्षणिक वर्षात करण्यात आले होते. त्यामध्ये माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक वाटचालीला उजाळा दिला. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मोठे कार्यक्रम घेण्यात अडचणी आल्या असल्या तरी अनेक कार्यक्रमातून सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला.
उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, उपप्राचार्य ए.डी.जगताप, पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र राऊत, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालय अधीक्षक भागवत गवंडी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.समाधान इंगळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमात पुढाकार घेतला.